आवळ्याचे सेवन केल्यास आपल्याला मिळतात हे आरोग्यदायी फायदे

आवळ्याचे सेवन केल्यास आपल्याला मिळतात हे आरोग्यदायी फायदे

ज्या मोसमात ज्या गोष्टी उपलब्ध होतात, त्या खाव्यात असे आपले पूर्वज नेहमी सांगत आले. सध्या हिवाळ्यात हिरवेगार आवळे बाजारात येतात. आवळा कच्चा, त्याचा रस किंवा भाजी या स्वरूपात जरूर सेवन करावा. मोसमी पदार्थांचे फायदे मिळण्यासाठी त्याच वेळी खाल्‍लेे पाहिजेत. म्हणूनच, आवळ्याचाही वापर आहारात जरूर करावा.

हिवाळ्यात भाज्या, फळांची रेलचेल असते. द्राक्ष, संत्री, अंजीर, आवळा अशी अनेक फळे असतात. त्या त्या मोसमात ती फळे खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदाच होतो. आहारात फळे आणि भाज्या यांना प्राथमिकता दिली पाहिजे. मोसमी फळे-भाज्या तर आरोग्यासाठी नक्‍कीच उपयुक्‍त असतात. आवळादेखील मोसमी फळांपैकी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारे एक फळ. आवळ्याचे औषधी गुण उपयुक्‍त आहेत. त्यामुळे हिवाळ्यात उपलब्ध होणारा आवळा आपल्या आहारात विविध प्रकारे समाविष्ट करून घेतला पाहिजे.

डोळ्यांसाठी फायदा : आवळ्याचे सेवन डोळ्यांसाठी चांगले असते. विविध संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. कारण, आवळ्यामध्ये ए जीवनसत्त्व आणि कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे नियमितपणे आवळा सेवन केल्यास डोळ्यांची क्षमता वाढते, तसेच मोतिबिंदूसारख्या रोगांपासून बचावही होतो. तसेच वाचताना डोळ्यांवर येणारा ताणही कमी होतो. रातांधळेपणामध्ये आवळ्याचा चांगला परिणाम होत असल्याचे दिसते. रात्री अंधुक दिसणे, रातांधळेपण आदी समस्यांमध्ये आवळा प्रभावी ठरतो. आवळा कच्चादेखील खाल्ला जाऊ शकतो. आवळ्याच्या रसामध्ये थोडे मध मिसळून तो पिऊ शकतो. आवळ्याच्या रसाचाही भरपूर उपयोग होतो.

मजबूत हाडे : आवळ्यात सी जीवनसत्त्व आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. कॅल्शियम हे हाडांच्या बळकटीसाठी, दात, केस, नखे आरोग्यदायी आणि बळकट करण्यासाठी आवश्यक असते. आवळ्याचे सेवन केल्याने त्यातून जे सी जीवनसत्त्व मिळते, ते सौंदर्य उजळण्यात महत्त्वाची भूमिका निभावते.

योग्य पचन : आवळ्यात भरपूर प्रमाणात तंतुमय घटकही असतात. त्यामुळेच आवळा खाल्ल्याने पोटातील वायू बाहेर पडण्यास मदत होते; शिवाय बद्धकोष्ठता, डायरिया, जुलाब या त्रासांमध्येही आराम मिळतो. जेवल्यानंतर सुकवलेला आवला खाता येतो. त्यामुळेही पचनसंस्था चांगली, उत्तम राहण्यास मदत होते.

केसांसाठी उपयुक्‍त : आवळा केसांसाठी उत्तम टॉनिक मानले जाते. अकाली पिकणारे केस म्हणजे केस पांढरे होण्यावर आवळ्यामुळे अंकुश ठेवता येतो. आवळा हेअर फॉलिकल्स मजबूत करतो. त्यामुळे डोक्याच्या त्वचेला होणारा रक्‍तपुरवठा वाढतो. त्यामुळे केस गळायचे थांबतातच, शिवाय केसाची वाढही होते. केस चांगले राहण्यासाठी रोज आवळ्याचे सेवन करू शकता, तसेच आठवड्यातून एक दिवस मेथी पावडर, शिकेकाई पावडर, काताची पावडर यासह आवळा पावडर रात्रभर भिजवून त्याची पेस करून केसाला लावावी.

केसाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. मधुमेह आणि रक्‍तदाबात फायदेशीर-कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि रक्‍तदाब आदींमध्येही आवळा फायदेशीर असतो. आवळ्यामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक आहेत. त्यापैकी एक म्हणजे क्रोमियम, त्यामुळे व्हाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. आवळ्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन होण्यास मदत होते. त्यामुळे रक्‍तातील शर्करेचे प्रमाण संतुलित राहते. रोज सकाळी आवळ्याचा रस प्यायल्यास रक्‍तदाबावरही नियंत्रण राहण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक क्षमता : आवळ्यामध्ये अँटिबॅक्टेरिअल आणि अ‍ॅस्ट्रिजंट गुण असतात, जे शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास महत्त्वाचे आहे. त्याव्यतिरिक्‍त आवळा अँटिऑक्सिडंट म्हणूनही काम करतो. शरीरातील फ्री रॅडिकल्स देखील कमी करतात. फ्री रॅडिकल्समुळे वाढत्या वयाच्या खुणा दिसतात. आवळा दुखापतग्रस्त पेशी रिपेअर करण्यासाठीही खूप उपयुक्‍त आहे. आवळ्याचा रस नियमितपणे सेवन केल्यास त्वचादेखील निरोगी राहण्यास मदत होते.

माहितीचे स्रोत – पुढारी न्युज

Team Hou De Viral