जाणून घ्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पत्नी प्रियदर्शिनीबद्दल, सौंदर्यासाठी प्रसिद्ध राणी

पहिल्यापासून ज्योतिरादित्य शिंदे यांना राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जात असे,परंतु त्यांनी आता काही दिवसांपूर्वी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत मध्यप्रदेशच्या राजकारणात जणू काय भूकंपच घडवला आहे. आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या २२ आमदारांनीही आपले राजीनामे दिलेत. त्यामुळे आता मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात आलंय. काँग्रेसचा हात सोडून ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये दाखल होणार असल्याचं कळतंय.
बऱ्याच काळापासून काँग्रेसमध्ये त्यांच्यावर अन्याय होत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच त्यांनी पक्षाचा राजीनामा देत आपल्यासाठी दुसरा मार्ग निवडलाय. ज्योतिरादित्य शिंदे माधवराव शिंदे यांचे चिरंजीव आहेत. ते भारत सरकारच्या १५व्या लोकसभा मंत्रीमंडळात वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री होते. शिंदे लोकसभेसाठी मध्यप्रदेशातील गुना इथलं प्रतिनिधित्व करत होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
ज्योतिरादित्य शिंदे यांचं खाजगी आयुष्य
ज्योतिरादित्य शिंदे यांचा विवाह १२ डिसेंबर १९९४ ला प्रियदर्शिनी राजे यांच्यासोबत झाला होता. प्रियदर्शिनी यांनी फेमिना मॅगझिननं जारी केलेल्या ‘India’s 50 Most Beautiful Women’ च्या यादीत आपलं नाव कोरलेलं आहे. १९७५ मध्ये जन्मलेल्या प्रियदर्शिनी या बडोदा राज्याचे राजे संग्राम सिंह गायकवाड यांची कन्या आहेत. त्या सोफिया कॉलेज मुंबईच्या विद्यार्थिनी होत्या.
ज्योतिरादित्य यांना पहिल्याच बघण्यात त्या पसंत पडल्या होत्या. ज्योतिरादित्य शिंदे १९९३ मध्ये हॉवर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन परतले आणि त्यांच्या विवाहाची चर्चा होऊ लागली. तेव्हा एका कौंटुंबिक कार्यक्रमात ज्योतिरादित्य आणि प्रियदर्शिनी यांची भेट झाली.
ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रियदर्शिनी यांचे दोन मुलं आहेत. त्यांचा मुलगा महाआर्यमन शिंदे आहे. तो अमेरिकेच्या येल विद्यापिठात शिक्षण घेत आहे. तर त्यांच्या मुलीचं नाव अनन्या शिंदे आहे.