रामायणासाठी किती मानधन मिळायचे? लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी म्हणाले…

रामानंद सागर यांच्या रामायण ही मालिका लॉकडाउनमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली. पण प्रदर्शित होताच या मालिकेने टीआरपीच्या यादीमध्ये पहिले स्थान पटकावत विक्रम केला.
मालिकेसह मालिकेतील कलाकार देखील चर्चेत आहे. मालिकेची आताची लोकप्रियता पाहता प्रेक्षकांना त्यावेळी रामायणात काम करण्यासाठी कलाकार किती मानधन घेत असतील असा प्रश्न पडला आहे. पण त्यांच्या या प्रश्नाचे मालिकेत लक्ष्मण हे पात्र साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनी उत्तर दिले आहे.
नुकताच सुनील लहरी यांनी आजतकला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना मालिकेशी संबंधीत अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये त्यांना मालिकेतील सर्व कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली होती आणि त्यांच्या मेहनतीसाठी त्यांना किती पैसे मिळायचे असा प्रश्न विचारण्यात आला.
‘मी फक्त इतकं सांगेन की फार पैसे मिळत नव्हते. पण त्या काळी आजच्या इतका खर्च देखील होत नव्हता’ असे त्यावर रामायणात लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी म्हणाले.
सुनील लहरी यांनी अप्रत्यक्षपणे कमी मानधन मिळत असल्याचे सांगितले आहे. ‘आजकाल एखादा कलाकार एक शो करुन घर घेऊ शकतो. पण त्यावेळी संपूर्ण रामायण मालिकेत काम करुनही आम्ही घर घेण्याचा विचार करु शकत नव्हतो’ असे ते पुढे म्हणाले.