रेखा-काजोलच्या ‘त्या’ फोटोमुळे उंचावल्या होत्या सर्वांच्याच भुवया

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री अर्थात रेखा नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असायच्या. वादविवाद असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमात त्यांची हजेरी असो, रेखा यांनी नेहमीच लाइमलाइटमध्ये राहणं पसंत केलं.
१९९६ मध्ये त्यांचा असाच एक फोटोशूट चर्चेचा आणि टीकेचा विषय झाला होता. एका मासिकाच्या कव्हर फोटोवर रेखा व काजोल एकत्र झळकले होते. त्यावेळी रेखा व काजोल यांचा हा फोटोशूट सर्वांत बोल्ड असल्याचं म्हटलं गेलं होतं. मासिकावरील त्या दोघींचा फोटो पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
जानेवारी १९९६ मध्ये एका प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर पेजसाठी रेखा व काजोलने फोटोशूट केलं होतं. पांढऱ्या रंगाच्या स्वेटरमध्ये या दोघींनी पोझ दिली होती. यावर चर्चा होण्याचं कारण काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण जर हा फोटो तुम्ही निरखून पाहिला असेल तर त्यात रेखा व काजोल एकाच स्वेटरमध्ये दिसत आहेत.
त्यावेळी भारतीय प्रेक्षकांसाठी एका अभिनेत्रीने केलेली ही सर्वांत बोल्ड गोष्ट ठरली होती. तोपर्यंत कुठल्याही वादविवादात नसलेली काजोलसुद्धा चर्चेचा विषय ठरली होती.
१९९२ साली काजोलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं आणि चार वर्षांतच ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. काही जणांनी त्यावेळी रेखा व काजोलची बाजू घेतली होती. या फोटोत काहीच चुकीचं किंवा अश्लील नसल्याचं मत त्यांनी मांडलं होतं. मात्र या फोटोशूटमध्ये बराच वेळ या दोन अभिनेत्री चर्चेचा विषय ठरल्या होत्या.