Fact Check : चिकन, अंडी खाल्ल्याने खरंच कोरोना व्हायरस होतोय का?

Fact Check : चिकन, अंडी खाल्ल्याने खरंच कोरोना व्हायरस होतोय का?

चीनच्या (China) वुहानमधून (Wuhan) जगभरात हातपाय पसरणाऱ्या कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धसका संपूर्ण जगानं घेतला. भारतातल्या लोकांनी तर अगदी चिकन (Chicken), अंडी (Eggs) खाणंही सोडून दिलं.

चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो, असं बरेच मेसेज सोशल मीडियावरही फिरत होतो. त्यामुळे तुमच्या ताटात चिकन किंवा अंडं आलं तर त्यावर ताव मारण्याआधी आपल्याला कोरोनाव्हायरस तर होणार नाही, असा प्रश्न येणं साहजिकच आहे.

मात्र खरंच चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो का? तर याचं उत्तर आहे नाही. खुद्द केंद्र सरकारने याची पुष्टी दिली आहे. चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होत नाही, असं केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं की, “चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो, ही अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. कोरोनाव्हायरस हा एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होतो आहे. चिकन खाल्ल्याने कोणत्याही व्यक्तीला कोरोनाव्हायरस झालेला नाही.

जगभरातील कोरोनाव्हायरसचा पोल्ट्री उत्पादनांशी काहीच संबंध मिळालेला नाही. त्यामुळे चिकन पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी बिनधास्तपणे खावं”गिरीराज सिंह यांनी पोल्ट्री उत्पादक आणि नागरिकांना या सूचना देण्याचे निर्देश दिलेत.

तसंच जर कोणालाही काहीही शंका असतील तर पशुपालन विभागाशी संपर्क करावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.कोरोनाव्हायरसच्या भीतीने नागरिकांनी चिकन, अंडीकडे पाठ फिरवली आणि पोल्ट्री उत्पादकांवर संक्रांत आली.

त्यामुळे देशातील कृषी आधारित उद्योग समूह आयबी ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी पशुपालन मंत्री गिरीराज सिंग यांची भेट घेतली. त्याचवेळी पशुपालन मंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

Team Hou De Viral