मनाचा मोठेपणा… घरकाम करणाऱ्या मुलीच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी थेट मावळमध्ये पोहचला बॉलिवूड अभिनेता

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असणारे जॅकी श्रॉफ हे त्यांच्या साधेपणासाठे ओळखले जातात. त्यांच्या याच साधेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आपल्याकडे घरकाम करणाऱ्या तरुणीच्या आजीचं निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर जॅकी थेट या मुलीच्या घरी म्हणजेच पुणे जिल्ह्यातील मावळमधील पवनानगर येथे पोहचले.
श्रॉफ यांच्याकडे काम करणारी दीपाली तुपे या तरुणीच्या आजीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. वयाची शंभरी ओलांडलेल्या तान्हाबाई ठाकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर आज सकाळी जॅकी स्वत: दिपालीच्या आजीच्या घरी गेले आणि त्यांनी कुटुंबाचं सांत्वन केलं.
श्रॉफ हे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीवर मात करून यश मिळवलेले अभिनेते म्हणून ओळखले जातात. सुरुवातीचे आयुष्य चाळीत काढल्याने जॅकी यांची सर्वसामान्यांशी नाळ जोडल्याचे अनेकदा दिसून येते. श्रॉफ यांचा मावळ येथील चांदखेड येथे बंगला असून मुंबईमधून ते अनेकदा या ठिकाणी आराम करण्यासाठी येत असतात.
अशाच एका भेटीदरम्यान श्रॉफ यांच्याकडे काम करणाऱ्या दीपालीच्या आजीचे शंभराव्या वर्षी नुकतच निधन झाल्याची माहिती त्यांना मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने दिपलीच्या आजीचे घर गाठत ठाकर कुटुंबाचे सांत्वन करत धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. जॅकी यांनी घरातील सर्व सदस्यांशी चर्चा करत त्यांची विचारपूस केली.
जॅकी यांच्यासारखा मोठा अभिनेता आजीच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी थेट आपल्या घरी आल्याचे पाहून ठाकर कुटुंब भारावून गेलं. जॅकी यांनी अगदी सर्वसामान्यांप्रमाणे जमीनीवर बसून घरातील वरिष्ठांचीही चौकशी करत त्यांना धीर दिला.जॅकी श्रॉफ यांनी यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारे आपल्या साध्या वागणुकीमधून चाहत्यांची मन जिंकली आहेत.