‘ओम फट् स्वाहा’ चा दरारा निर्माण करणारे ‘झपाटलेला’ फेम ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ काळाच्या पडद्याआड

‘ओम फट् स्वाहा’ चा दरारा निर्माण करणारे ‘झपाटलेला’ फेम ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे आज दुपारी पुण्यात वृध्दापकाळाने निधन झाले. अत्यंत शांत स्वभाव, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन , कलेवर गाढ श्रध्दा ,नैसर्गिक अभिनय अश्या अनेक गोष्टींमुळे राघवेंद्र उर्फ अण्णा स्मरणात राहतील.

कडकोळ यांनी अनेक चित्रपटात अभिनय केला असून झपाटलेला या चित्रपटातील मांत्रिकाची त्यांनी साकारलेली भूमिकेला रसिकांनी डोक्यावर घेतली होती.दोन दशकांपूर्वी रिलीज झालेल्या ‘झपाटलेला’ या सिनेमाचा उल्लेख निघाला की सर्वपथम आठवतो तो तात्या विंचू आणि त्याला ‘ओम फट् स्वाहा’ हा मृत्युंजय मंत्र देणारा बाबा चमत्कार.

लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि दिलीप प्रभावळकर यांच्यासह राघवेंद्र कडकोळ यांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात होत्या. राघवेंद्र कडकोळ यांनी बाबा चमत्कार ही व्यक्तिरेखा वठवली होती. ‘झपाटलेला’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही राघवेंद्र झळकले होते.

राघवेंद्र कडकोळ यांनी कृष्णधवल चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. रंगभूमीवर त्यांनी काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर यासारख्या दिग्गज कलावंतांसोबत काम केले. नववीत शिकत असताना असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लिखाण झापटल्यासारखे वाचले. त्यामुळे सावरकरांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर होऊ लागला.

याच दरम्यान त्यांनी आपले शिक्षण सोडून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. नौदलात भरती होण्यासाठी परीक्षा पास केल्या. भारतीय आयएनएस विभागात एका टीम सोबत त्यांना पाठवण्यात आले. तेथील समुद्र, बोटी पाहून ते अगदी भारावून गेले. शेवटी आपण जे ठरवले ते प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद त्यांना होत होता.

परंतू त्या टीममधून राघवेंद्र यांना बाजूला काढून पुन्हा मेडिकल टेस्ट घेण्यासाठी पाठवण्यात आले. यागोदरच सगळ्या मेडीकल टेस्ट पास करूनच त्यांना तिथे पाठवण्यात आले असताना पुन्हा ही टेस्ट कशासाठी? असा प्रश्न त्यांच्या मनात घोळत बसला. रिपोर्टमध्ये त्यांच्या एका कानात दोष असल्याचे कारण सांगून त्यांना घरी पाठवण्यात आले होते.

दोन वर्षांपूर्वी राघवेंद्र यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. त्यांनी गोल्ड मेडल नावाचे पुस्तक लिहिले आहे.

Team Hou De Viral