‘महाभारत’मध्ये देवराज इंद्रची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे निधन, शेवटचे फोटो पाहून डोळ्यात पाणी येईल

हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमधील ज्येष्ठ अभिनेते सतीश कौल यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. सतीश कौल यांनी जवळपास ३०० हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.
‘महाभारत’ या पौराणिक मालिकेत त्यांनी देवराज इंद्रची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘सर्कस’ आणि ‘विक्रम वेताल’ या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये त्यांना प्रचंड आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. लुधियानात एका छोट्या भाड्याच्या घरात ते राहत होते. त्याआधी ते वृद्धाश्रमात राहत होते.
औषधं, भाज्या आणि जीवनावश्यक वस्तूंसाठीही त्यांना आर्थिक चणचण भासत होती. त्यांनी चित्रपटसृष्टीला मदतीचं आवाहन केलं होतं. “अभिनेता असताना माझ्यावर लोकांनी भरभरून प्रेम केलं. पण मला आता एक माणूस म्हणून मदतीची गरज आहे”, असं ते म्हणाले होते. ७४ वर्षीय सतीश कौल यांनी ‘प्यार तो होना ही था’, ‘आंटी नंबर १’ या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या.
“जर लोक मला विसरले असतील तर ठीक आहे. पण मला मिळालेल्या प्रेमासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. मला कोणीतरी काम द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. मला पुन्हा अभिनय करायचं आहे”, अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

जवळपास २५ वर्षांपूर्वी त्यांच्या आईवडिलांच्या कॅन्सरवरील उपचारासाठी त्यांना मुंबईतील फ्लॅट विकावा लागला होता. उपचारानंतर उरलेल्या पैशांत त्यांनी बहिणीच्या लग्नाचा खर्च उचलला. काही वर्षांनंतर त्यांनी लुधियानामध्ये अॅक्टिंग स्कूल सुरू केलं. मात्र त्यातही त्यांना आर्थिक फटका बसला.